Tuesday, 4 October 2022

धम्म चक्र प्रवर्तन दिन !!!

 



           बुद्ध म् शरणम् गच्छामि |
           धम्म म् शरणम् गच्छामि|
            संघम शरणम् गच्छामि |

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमी दिनी   नागभुमिवर नागपुर  मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारुन एक नवी क्रांती घडवून आणली.. प्रज्ञा ,शील , करुणा ,समता  यांचा संगम असलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या ५ लाख अनुयाया सोबत धर्मांतर केले..  बुद्धाला, धम्माला,संघाला शरण गेले..


      बुध्दीप्रामाण्यवादी , समतेच्या, न्यायाच्या तत्वावर आधारलेल्या  धर्माच्या शोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.त्याचे उत्तर बुद्ध धर्माच्या तत्वाने मिळाले....  ज्या मनुस्मृती ने  विषमता निर्माण केली, समाजामध्ये , माणसामध्ये दरी निर्माण केली ..   माणसाला माणूस म्हणुन हक्क नाकारला , पिण्याच्या पाण्याचा  हक्क , शिक्षणाचा हक्क नाकारला अशा व्यवस्थेचा, हिंदु धर्माचा त्याग करण्याचा निर्धार केला. 

नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह 1930-35
मंदिर प्रवेशासाठी अधिक काळ चालणारा हा जगातील एकमेव सत्याग्रह.. अहिंसेच्या मार्गाने प्रयत्न करूनसुद्धा सवर्णांच्या मनाला अस्पृश्यासाठी पाझर फुटला नाही..प्रवेश नाकारला गेला तेव्हा मात्र बाबासाहेबांनी आपला निर्धार ठाम केला.३ ऑक्टोबर १९३५ येवले येथे नाशिक मध्ये बाबासाहेबांनी  भीमगर्जना केली..
" कोणत्या धर्मात जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हते , पण कोणत्या धर्मात मरायचे हे माझ्या हातात आहे ,
मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही
विषमतेवर  आधारलेल्या धर्माचा मी त्याग करतो.."


बाबासाहेबांची बुद्ध धर्माकडे वाटचाल..

     बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा संबद्ध हा बाबासाहेब विद्यार्थी असताना पासूनच आहे.. मॅट्रिक ची परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजीनी बाळ भिमाला गौतम बुद्धाचे चरित्र बक्षीस दिले होते.  तेव्हापासून सुप्त मनामधे बुद्धांचे विचार दृढ होत होते.  १९३५ नंतर बाबासाहेबांनी शीख , ख्रिश्चन,मुस्लिम धर्माचा अभ्यास केला. पण बुद्धाच्या समतने ,प्रज्ञेने, करुणे ने त्यांना प्रभावित केले.. म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ या विजया दशमी दिनी  बुद्ध धर्म स्वीकारण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.. 



 
विजया दशमी चे महत्व
        प्राचीन भारतात चक्रवर्ती सम्राट अशोक  या  राजाने विजयादशमी दिनी बौद्ध धर्म स्वीकारुन बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला होता.. आणि बुद्ध धम्माच्या तत्वांचा प्रसार  केला .  बुद्धाचे तत्व , व धम्म अमर झाला..  आणि १९५६ रोजी बाबासाहेबांनी हाच  धम्म स्वीकारुन बुद्ध धर्माला या भारत भूमीवरील पुनर्जीवित केले...आणि समतेचा,करुणेचा, न्यायाचा स्वर या भूमीवर निनादू लागला.कोणत्याही अमिषाशिवाय, तलवारीच्या धाकाशिवाय एवढ्या मोठ्या संख्येने धर्मांतर झालेली ही जगातील एकमेव घटना होय.
वामन दादा कर्डक यांच्या शब्दात  आजच्या दिनाचं महत्व

श्री बुद्धाच्या चरणावरती, विजयादशमी दिनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं

मूळ गाडण्या विषमतेचे, मार्ग असा वेचला
मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला
श्री बुद्धाच्या महामंत्राचा, निनादला तो ध्वनी

थोर भाग्य हे दलित जनाचे भीमरत्न लाभले
व्यथा तयाची दूर जाहली, कार्य महा साधले
सोने लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी

कितीक झाले या अवनीवर, संत मुनी ज्ञानी
करू न शकले आजवरी ते, केले भीमाने जणी
उद्धरली नवकोटी जनता, रूढी मोडुनी जुनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं


धम्म चक्रप्रवर्तन दिना निमित्त  माझ्या सर्व वाचकांना   मंगलमय शुभेच्छा 💐💐💐


प्रलय भारत सावंत
५ ऑक्टोबर २०२२
          



 

   
          

महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...