Thursday, 19 March 2026

महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!


तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस,

एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस..


 महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचलित सामाजिक विषमतेला आव्हान देणारे आणि माणसाला माणूस म्हणून हक्क मिळवून देण्यासाठीचा  सत्याग्रह होता. हा सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी २० मार्च १९२७ रोजी झाला.आणि महाड सामाजिक चळवळीच्या इतिहासात अजरामर झाले .

बाबासाहेबांना शाळेत असताना चंद्र व सूर्य या पेक्षा दूर पाण्यानी भरलेला मटका वाटत असे..कारण पाणी वाढणारे व्यक्ती जर शाळेत नाही आली.तर बाबासाहेबांना पिण्याच्या पाण्याला स्पर्श सुद्धा करण्यास मनाई होती. म्हणुनच आपली शिक्षण पूर्ण झाल्यावर , कायदे तज्ञ झाल्यावर सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी प्राशन करण्यासाठी लढा देण्याचे ठरवले. 




निसर्ग जर कोणता भेदभाव करत नसेल तर आपण भेदभाव करणारे कोण ? असा परखड सवाल बाबासाहेबांनी केला. जगात असा हा एकमेव सत्याग्रह म्हणून महाड सत्याग्रहाची नोंद आहे. बाबासाहेबांनी नेतृत्व केलेल्या या लढ्याचे भारताच्या समतेच्या, लढ्यात महत्वाचे स्थान आहे. या सत्याग्रहानी समतेचे नवे पर्व सुरू झाले. 

हजारो वर्ष जिथे ओंझळीभर पाणी पिण्यासाठी वाट पहावी लागली त्या ठिकाणी पाणी पिताना अनेकांच्या डोळ्यात पाणी नक्की आले असेल !  यामुळेच स्वतंत्र भारतात अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून भारतीय राज्यघटनेत या हक्काचा मूलभूत हक्क म्हणून समावेश केला..


हा लढा समजल्यावर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १५,१६ ,१७ याचे महत्व समजते.. अनुच्छेद १५ सांगते की , सार्वजनिक ठिकाणी जात,धर्म, वंश, लिंग,किंवा जन्मस्थान या वरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे..,

१५ (२) कोणत्याही नागरिकाला दुकाने, हॉटेल्स, सार्वजनिक रेस्टॉरंट्स किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी प्रवेशापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. 

अनुच्छेद १६- सर्वांना नोकरीमध्ये समान संधीची हमी देते.सरकारी नोकऱ्यांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा निवासस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते 

 अनुच्छेद १७ अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. 

  असा हा मानव हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना विनम्र अभिवादन !!











Thursday, 4 December 2025

गोष्ट थर्ड टायर गव्हर्नमेंटची ...


गोष्ट थर्ड टायर  गव्हर्नमेंटची ...!!!



      Image source free press journal insta..


नुकतीच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका पार पाडल्या, काही अजून बाकी आहे..

पण या सर्वसाधारण निवडणुका बघितल्या आणि बातम्या बघितल्या तर निवडणुकी पुढे, व मुळातच लोकशाही पुढे येत्या काळात आव्हान उभे राहणार आहे हे नक्की झाले आहे.

         पैशाचा अमाप वापर,बोगस मतदान, हाणामारी, या संख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे..स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्न सोडवणे सोपे.. म्हणून या तिसऱ्या स्तराचे अनन्य साधारण महत्व आहे.पण ज्या प्रकारे आज गोष्टी घडत आहे. त्या पाहून एक सामान्य , जागरूक नागरिक चिंतेत आहे. 

     जनसेवा म्हणून न पाहता राजकारण हा गुंतवणुकीचा विषय बनला आहे. परिणामी कररूपी भरलेल्या पैशाचे काळया पैशात रूपात होणे कोणी रोखू शकत नाही.आता नवीन कामाच्या निविदा निघतील पण किंमत (सामाजिक,आर्थिक,राजकीय) मात्र मोठी असणार ही नक्की!

नागरिक ही उमेदवाराचा अजेंडा काय?व्हिजन काय आहे ? या विषयी न बोलता कोण किती रुपये देत आहे या विषयी बोलत आहे. ही सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. 

   आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीयांच्या आरक्षणासबंधीचा . स्त्रियांचा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग ही विकासाची पूर्व अट आहे . म्हणूनच स्त्रियांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे . त्या नंतर स्वच्छतेचा, पाण्याचा, शिक्षणाचा, सुरक्षेचा प्रश्न राजकीय पटलावर स्थानिक पातळीवर स्त्रीयांमुळे केंद्रस्थानी आला.. परिणामी १९९२ नंतर वरील क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली यात शंका नाही! त्या सोबतच स्थानिक नेतृत्व ही उभे राहिले .

    पण आज प्रश्न आला आहे तो घराणे शाहीचा. जर आरक्षण लागू झाले तर त्या नेत्याची बायको, सून,मुलगी यांनाच स्थान देऊन राजकारण ठराविक घरात पुरतेच मर्यादित होत आहे. अनेक मंत्र्यांचा घरातले बिनविरोध नगराध्यक्ष झाले.. याची कारण न शोधलेली बरी..

       आज राजकीय क्षेत्रात नवीन सुधारणा करण्याचे मुद्दे आहेत.त्यात एक राष्ट्र एक निवडणूक हा एक.पण आज निवडणूकीची ची परिस्थिती बघता ते नवीन संविधानिक आव्हान उभे करणार आहे. त्या मुळे स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जाणार हे नक्की.आज फक्त एका राज्यात निवडून घेताना आयोगाची जी तारांबळ होत आहे ते पाहता एक निवडणुकीचा हट्ट सोडलेला बरा!


      Image   Source State Election Commission Maharashtra


प्रश्न निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हततेचा

एस .आय .आर (S.I.R), निवडणूक आयोगाची कार्य पद्धती, नेमणूक पद्धती या मुळे आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे . विरोधी पक्ष नेते यांनी जे मुदे किंवा प्रश्न उपस्थित केले त्याला आयोगाने असमाधानकारक उत्तरे दिले..असाच प्रश्न राज्य निवडणूक आयोग बदलही उपस्थित झाला आहे.

 उपाय आहेत पण राजकीय इच्छा शक्तीचा अभाव दिसून येत आहे. नागरिकांची जागरूकता,vvpat ची मोजणी, कमिशनर नेमायची पद्धत  यात बदल करणे गरजेचे आहे.त्याशिवाय एस.आय .आर (S.I.R) मुळे ज्यांची नावे वगळली आहेत त्यांची यादी तयार ठेऊन त्यांनाही ओळख पत्र दाखवल्या नंतर मतदान करू देणे.असाच प्रयोग केंद्रीय निवडणूक आयोगाने नि यापूर्वी बिहार , राजस्थान, मधे २००७_८ दरम्यान केला होता. पक्षांतर्गत लोकशाही पण रुजवणे तितकेच गरजेचे आहे. ज्या मूळ घराणेशाही वर काही अंशी आळा बसेल. 

आणखीन महत्त्वाचे म्हणजे सिव्हिल सर्व्हिस जी पोलादी चौकट समजली जाते तिने आपली भूमिका निःपक्ष,पार पाडणे गरजेचे आहे. आज अजून एखादे टी एन शेषन होणे काळाची गरज आहे. 

      निवडणुका होतील,सत्ता येईन पण आपल्या देशाचे संविधान, लोकशाही टिकली पाहिजे.


प्रलय लतिका भारत सावंत 

४ डिसेंबर २०२५

  

Wednesday, 4 September 2024

शिक्षक दिन आणि आम्ही..

 


                     (Image source google)


शिक्षक दिन आणि आम्ही..

          शिक्षक हे राष्ट्राचे सारथी असतात. देशाचे भविष्य घडविण्याची जवाब दारी त्याच्यावर असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुषात शिक्षक,गुरू असतो.  आपल्या आई पासून त्याची सुरवात होत असते..मला भाग्य लाभले की माझ्या आयुष्यात बाराखडी ची सुरुवात माझ्या माऊलीनी केली. तीनच शिकवले मला सहनशीलता, जिद्द,त्याग, निःसीम प्रेम!

       प्रत्येक व्यक्तीला आयुष्याला कलाटणी देण्याची ताकद शिक्षकात असते.. शिक्षक हे आपल्या आयुष्यासाठी घडवत असतात..मला गृहपाठ वेळेत करायला लावणाऱ्या   मॅडम , शाळेत उशीर झाला म्हणून शिक्षा देणारे सर आठवतात. यामुळेच मनावर शिस्त, वक्तशीर पणा या मूल्यांची संस्कार होत गेले  .मग आयुष्याच्या शाळेत हीच मूल्ये ,आपण कोणत्याही क्षेत्रात असो यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात निर्णायक ठरतात..मला आठवतं. अभियांत्रिकी कॉलेज मध्ये   असताना एके दिवशी प्रिन्सिपॉल डॉ डी.जी.बोरसे सर आले होते ..ते म्हणाले होते.  "आम्हाला या कॉलेज मध्ये हिरो नकोत आम्हाला विद्यार्थी हवेत. नंतर हेच  विद्यार्थी आपल्या आयुष्यात हिरो बनत असतात.आणि समाजापुढे आदर्श निर्माण करत असतात." . अशी अनेक आयुष्याची समीकरण आपल्याला  शिक्षकामुळे उलगडत असतात. मला कौतुकाची थाप देणाऱ्या चव्हाण मॅडम, गुणवत्ता यादीत आल्यावर गुणपत्र सजवणाऱ्या घोडके मॅडम, चुकल्यावर छडी मारनाऱ्या कुंभार मॅडम( कारण  छडी लागे छम छम,विद्या येई घम घम).. अशी शिक्षकांची  यादीच डोळ्या पुढे उभी राहते.. शिक्षक हे उत्प्रेकाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच विद्यार्थ्याचा प्रगतीला गती येत असते .

         शिक्षक( शि शिलवान ,क्ष क्षमशील ,क कर्तुत्व वान ) या गुणांचा मिलाफ असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय.    गुरूचा आदर प्रत्येक संस्कृतीमध्ये केला जातो... 

       विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन !

      स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते !!  

एका राजाची आणि विद्वानांची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण राजा हा त्याच्या राज्यात पुजला जातो.मात्र विद्वान हे सर्वत्र पूजनीय असतात..

        दुसऱ्या व्यक्तीला मोठ करण्याची आणि मोठ होताना बघण्याची हिम्मत ही काही जणातच असते. ही हिम्मत शिक्षकात असते .शिक्षक गण हे निस्वार्थ ज्ञानदान करणारे असतात.. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ  रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले हे त्या पैकीच एक होय .  हे भारताला लाभलेलं महान शिक्षक . त्यामुळेच आपण सर्व जण विकसित भारताचे स्वप्न पाहत आहोत आणि प्रत्येक क्षेत्रात आपली घोडदौड चालू आहे. 

प्रत्येक व्यक्ती चया अंगी उपजत गुण असतात.. प्रत्येकातील गुण ओळखून  त्याला चालना देण्याचे काम शिक्षक करत असतात.. प्राचीन काळापासून हे महान कार्य अविरत चालू आहे .

सॉक्रेट्स नावाचा शिक्षक  विद्यर्थ्यांना विचार करायला शिकवतो, चार्वाक तत्त्वज्ञ बुध्दी प्रामाण्य वादाचां पुरस्कार करतो , बुद्ध स्वयं प्रकाशित व्हायला शिकवतात...अशा अनेकांची इतिहासाने दखल घेतली आहे. 

  आजच्या भौतिक वादी जीवनात भावनिक गुंतागुंत वाढत चालली आहे . डिजिटल युगात तर शिक्षकाची भूमिका पुन्हा अधोरिखित झाली आहे.. माहितीचा भडिमार होत आहे. आज सोबत जरी इंटरनेट असला तरी तो माहिती देऊ शकतो..स्वप्न दाखवू शकत नाही. ही भुमिका शिक्षकच लीलया पार पाडतात .

  व्यक्तीच्या जडण घडण होत असताना  संवाद गरजेचां  असतो , विचारांची देवाण घेवाण होणे महत्वाचे असते शालेय जीवनात विचारांना अंकुर फुटत असतो. त्याला योग्य खत पाणी हे आपले शिक्षक घालत असतात .. त्यामुळेच समाजात ज्ञानरूपी मळा हा बहरत असतो. आणि या मल्याची फळे प्रत्येक जन विकासाच्या , सुधारणेच्या ,सुशासनच्यां  रुपात चाकत असतो.

 अशा प्रकारे शिक्षक ही राष्ट्राची सेवाच करत असतात..

 अशा सर्व शिक्षकाना शिक्षक दिना निमित  शतश: नमन🙏🙏🙏

 प्रलय लतिका भारत सावंत 

(५ सप्टेंबर २०२४)

Monday, 13 February 2023

प्रेमाची सीताराम भाषा

 

                                    Source  google
 

    प्रेम फक्त मिळवन नसत,तर प्रेम म्हणजे ऐकमैकाना समजणं असत. सोबत नसताना सुधा तिचां सहवास म्हणजे प्रेम होय. आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात बघितल्यावर एकमेकांना मिळणार समाधान म्हणजे प्रेम असते.अशाच प्रेमाचं दाखला आपणाला सीता राम या चित्रपटातून मिळतो.   
  प्रेंम निर्माण होण्यासाठी एक लम्हा गरजेचा असतो. तो लम्हा राम आपले कर्तव्य बजवताना सीतामहालक्ष्मी च्या आयुष्यात येतो . नकळतच ती रामच्या प्रेमात अडकत जाते..पत्र व्यवहार ते भेटी गाठी असा प्रेमाचा प्रवास(हैदरााबाद ते काश्मीर) दोंघांच्या नात्याबदल आदर निर्माण करतो.
           धार्मिक बंधन न जुमानता आपली प्रिन्सेस नूरजहान (सीतामहालक्ष्मी) रामच्यां प्रेमात पडते.. आपल्या भावाला न घाबरता तिचे राम वरचे प्रेम कबूल करते.प्रेमाला कोणताही धर्म,जात नसते ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे.



                             Source google

         प्रेमाची भाषा फक्त जोडीदार पूर्ती मर्यादित न ठेवता बहिणीच प्रेम सुधा एका विलक्षण प्रकारे दाखवले आहे . आपण अनाथ आहे असं जेव्हा राम radio वर सांगतो तेव्हा सर्व देश भरातून त्याला पत्र येतात.. शुभांगी नावाची स्त्री त्याला बहीण म्हणून पत्र लिहते.
सुट्टीत तो तिला आवर्जून भेटायला येतो..ती सेक्स वर्क मध्ये अडकली असून सुधा राम तिचा बहीण म्हणून स्वीकार करतो.तिच्या सोबतच्या सर्व जनीची सुटका राम करतो . या संकटातून त्रासातून मुक्त करतो त्या साठी आपली सर्व जमा पुंजी खर्च करतो. 
        प्रेम या भावनेत मातृभूमी 🇮🇳चे प्रेम पण अगत्याने आलेच ..आपल्या भारत मातेसाठी आपल्या प्रेमाला पण त्याग करायची तयारी राम दाखवतो...आणि आपल्या असीम देशभक्ति चा मापदंड निर्माण करतों..
आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तो पाकिस्तान मध्ये भारत विरोधी कारवाई करणाऱ्या म्होरक्याला मारण्यासाठी जातो. मिशन पूर्ण झाले होते तरी एका लहान मुलीला आगीतून वाचवण्यासाठी तो थांबतो.आणि तिला सुखरूप बाहेर काढतो.पण दुर्दैवाने कॅप्टन राम पाकिस्तानच्या लष्कराच्या हाथी सापडतो..
मग तुरुंगातच आपल्या मातृ भुमिसाठी कोणतीही तडजोड न करता राहतो. इथे नूरजहान पण राम ची वाट पाहते.. अस वाट पाहण्यात सुधा प्रेम असते .ती त्याची आयुष्भर वाट पाहते....
    सर्व कलाकारांनी पात्राला न्याय दिला आहे.त्यांचे मनापासून आभार 🙏🙏🙏.मृणाल ठाकूर (नूरजहान/ सीता ),   डी सलमान(कॅप्टन राम ) यांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते... कॅप्टन राम चा निरागस पणा मनाला भावतो..नूरजहान चे राम बदल चे प्रेम ,तिचा प्रिन्सेस असुन सुध्दा साधेपणा तिच्या बदल आपुलकी निर्माण करते. मानवी कला कृतीचा उत्कृष्ट नमुना म्हंटले तरी वावग ठरणार नाही.. व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वांना प्रत्येकाला आपली नूरजहाँ आणि आपला राम भेटो अशीच मनोकामना. ....


  प्रलय लतिका भारत सावंत
       १४ फेब्रुवारी २०२३  

Saturday, 31 December 2022

नये साल की हो अगवानी. !

                                                    इमेज@ गूगल 
                                                 


                                                बंद करे हम पिछला खाता 

                                               नये साल की हो अगवानी. !

                 नव्या वर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाचं निरोप सांगणारी कविता सातवीला हिंदीच्या पुस्तकात होती. या कवितेला आणि आपल्या आयुष्याला जोडायला शिकलो आहे .नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सर्व जण सज्ज आहोत. 

                जाणाऱ्या वर्षातून आपण नक्कीच काही तरी शिकलो असणार..आपल्या आयुष्याची उदिष्ट, ध्येय याचा आपण सर्व जण पाठलाग करत आहोत.. काही पूर्ण झालीत,तर काही अजून बाकी आहेत. अपूर्ण राहिली म्हणून नाराज होण्याची गरज नाही. येणाऱ्या वर्षी पूर्ण करण्याची संधी आपणास लाभत आहे. कारण,

                                          पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

                २०२० वर्षाच्या कोरोना संकटातून आपण सुखरूप वाचलो याच भान प्रत्येकाने ठेवायला हवे.. त्यामुळे आपला पुनर्जन्मच झाला आहे असू समजू. पुन्हा एक संधी म्हणून आपण याकडे पाहुयात.. म्हणुनच आपण आपल्या मिळालेल्या आयुषाबदल कृतज्ञ असायला हवे..

  नव्या संकल्पाचा निर्धार

                 तसे सारेच बदलत असते. ऋतू बदलतात,वर्ष बदलतात. पण बदलत नाहीं ते सजगपणे जग जाणून घेण्याची , सारे विवेक बुद्धीने समजून घेत स्वतःला विचार समृध्द करण्याची आकांक्षा(लोकसत्ता). आपल्यातल्या जिज्ञासू वृत्तीला आणखीन प्रखर करण्याचा निर्धार करू..

                या जगात, मानवात जे काही चांगले आहे,ते प्राप्त करण्याचा आणि पुढील पिढीकडे हस्तांतर करण्याचा दृढ निश्चय करूयात. विश्वाकडे आपण सर्वोत्तमच मागू..

                       तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे

                   जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे!

           आपणाला जे काही उत्तम लाभते त्याचा आपल्या समाजाला ,देशाला पण लाभ झाला पाहिजे. तरच आपल्या आयुष्याचं सार्थक झाले असे समजावे.कारण आपल ते सामाजिक देणं आहे..म्हणूनच समाजात व आपल्याला भेटलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात चिरकाल टिकणारा आनंद निर्माण करूयात.

           'असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीची भेट होण्यात काही तरी कारण असत.'     मागील वर्षात अनेक व्यक्तींची ओळख झाली असेल.काही जणासोबत अनोखे नाते निर्माण झाले असेल. त्या सर्वांचं मनापासून आभार,🙏🙏🙏 मानुयात. काही कारणामुळे काही जण आपल्यापासून दूर असतील .पण मला खात्री आहे आपली माणस पुन्हा आयुष्यात येतात..

                प्रत्येक व्यक्तीला भूतकाळ असतो. काहीसां गोड तर काही कटू. भूतकाळ गोड, चांगला असेल तर उत्तम.नसेल तर गेलेल्या काळाचा विचार करून येणाऱ्या भविष्याच नुकसान करू नये.कारण आपल्या भूतकाळाला डिलीट button नसते..त्यामुळे तो delete करता येत नाही..मात्र सुंदर ,आनंदी भविष्य घडविण्याचे बटन आपल्या हातात आहे. आपणच आपलं भविष्य निर्माण करू शकतो ,कारण आपणच स्वतःचे भाग्य विधाते आहोत.म्हणुनच आपल्या उद्दीष्टचा, स्वप्नाचा पाठलाग करणे सोडू नका. स्वतःचा "स्व " ओळखा. 

               आपण जेव्हा जन्माला आलो त्यापेक्षा सुंदर जग बनवण्याचा संकल्प करुयात.. आपली उदिष्ट ,स्वप्न ही नेहमी पूर्ण होतात फक्त आपली त्यावर अढळ श्रद्धा असली पाहिजे..ओम शांती ओम चित्रपटात डायलॉग आहे ना

                   अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी

          कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।

      अशीच विश्वातील सर्व शक्ती, आपल्या पाठीशी उभी राहू हीच मनोकामना .

         चला तर आता गत वर्षाचे सिंहावलोकन करूयात आणि येणाऱ्या वर्षी जी धेय्य, उद्दीष्ट अपूर्ण राहिली त्यांचा पाठलाग करूयात. प्रत्येक क्षण आनंदात, समाधानात जगुयात . कोणाबदल असूया न बाळगण्याचा निर्धार करूयात कारण

                       हर पल यहा जी भर जियो

                    जो है समा ओ कल हो ना हो|

आयुष्याच्या आणखीन एका innings साठी जिद्दीनं, उमेदीने तयार होऊयात, आणि आपली सर्व ईप्सिप्त साध्य करुयात. माझ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!!!!💐💐💐💐


   @प्रलय लतिका भारत सावंत

     १ जानेवारी २०२३







Monday, 5 December 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏



        "तू दाखविली जगाला नवी मानव नीती

         तुझी ख्याती गाजते या जगती

         लोटून गेले वर्ष किती

       तरी आजही बोलवते ती चैत्त्यभूमीची माती."

      

          ६ डिसेंबर १९५६ रोजी मानवतेचा मुक्तिदाता , अस्पृश्यांचा कैवारी,स्त्री उद्धारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले .. बाबासाहेबांचे आणि मानव जातीचे घनिष्ट असे नाते आहे.. मानवी हक्कासाठी , रक्तविरहित मार्गानें लढणारे ते युगपुरुष होते. म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून जनसागर चैत्यभूमीवर येतो.  

         डॉबाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजले, आणि भारतीयांच्या आयुष्यात न्यायाचा,समतेचा, बंधुत्वाचां, लोकशाहीचा सुगंध पसरवून गेले.

          बाबासाहेबांचं अलौकिक कार्य त्यांना अजरामर करून गेले.. त्यांची प्रेरणा,स्वप्न., भारतीयाच्या मनात जीवंत आहेत. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा.. हा त्यांचा संदेश आजही अनेकांना आपला मार्ग दाखवत आहे..शिक्षणाचं महत्त्व त्यांनी खालील शब्दात विषद केले आहे 

       शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

    - डॉ बाबासाहेब आंबेडकर(१८९१-१९५६)

शिक्षणामुळे माणसाचा स्वाभिमान जागृत होतो..तो आपल्या अणि इतरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरणा देतो . शिक्षणानेच राष्ट्राची उन्नती होतें.त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणाने भारताची घटना लिहून आपल्या देशाचे भाग्य ठरवले . तुम्ही भारताचे भाग्य विधाते ठरला..

    हजारो वर्ष प्रचलित असलेल्या मनुस्मृती वर आधारलेल्या व्यवस्थेला, विषमतेला, नेस्तनाबूत केले..बाबाआपण लिहलेल्या संविधानान आपला भारत देश चालतो..संविधानाची प्रत्येक तरतूद तुमची आठवण करून देते.

     बाबा तुम्ही दिलेले अधिकार, शेतकऱ्यांचे ,कामगारांचे, स्त्रियांचे,समतेचा, न्यायाचा अधिकार दररोज तुम्ही सोबत असल्याची जाणीव करून देतात.  तुम्ही दाखवलेली नवी आर्थिक किरणे भारताला आज मार्गदर्शक ठरत आहेत.भारत भूमीवर बुद्ध धर्म स्वीकारून पुन्हा या भूमीवर प्रज्ञा ,शील, करुणा आणि पंचशील यांना पुनर्जीवित केले..

  आपल्या १८९१-१९५६ एवढ्या कारकीर्दीत ऐतिहासिक रक्तविरहीत सामजिक क्रांती घडवून नवा मापदंड निर्माण केला...आपण कायदेतज्ञ,पत्रकार,घटनातज्ञ, अर्थतज्ज्ञ,मानववंश शात्रज्ञ इ.होता.

 आपल्या थक्क करणाऱ्या प्रवासाकडे पाहून आपला

"Life should be great than long". हा संदेश सार्थ ठरतो...

अशा या ज्ञानाच्या महासागरास, मुक्तिदात्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏


जय भीम 

प्रलय भारत सावंत

६ डिसेंबर २०२२


Saturday, 26 November 2022

भारतीय संविधान दिन !!!

 

                       सौजन्य Google

संविधान दिन 

         नव्याने स्वतंत्र झालेल्या भारत देशाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ,सामाजिक,अर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे , बंधूभाव जोपासणारे, व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे, आणि राष्ट्राचे एकता व एकात्मतता राखणारे संविधान स्वीकारुन देशाने आपल्याला प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण होण्यास कटिबध्द केलं...

    आपल्या उदेश पत्रिकेची सूरवात "आम्ही भारताचे लोक" या पासून सुरू झाली आहे ... भारत देशातील सत्ता, अधिकारकेंद्र ही भारतीय नागरिकांच्या हातात आहे.. भारताचे नागरिकच भारताचे भाग्यविधाते आहेत. असा त्याचा अर्थ ध्वनित होतो.

           लोकशाही मूल्यं हीच भारताला पोषक आहेत याची खात्री घटनाकारांना होती.. सामाजिक विषमतेमुळे,मनुवर आधारलेल्या व्यवस्थेने समान संधी , माणूस म्हणून हक्क नाकारले होते..हेच कटू वास्तव स्वीकारुन लोकशाही वर आधारित लिखित संविधान स्वीकारुन प्रत्येक व्यक्तीला कायद्या पुढे समान बनवले..प्रत्येकाच्या हक्काचे रक्षण ,प्रत्येकाला समान संधी ची लिखित हमी दिली गेली... कायद्याचे राज्य , कायद्यापुढे समानता ही तत्व या भारत भूमीवर निनादु लागली.  

पार्श्वभूमी        

            2 वर्ष 11 महिने 18 दिवस असे सर्वसमावेशक असे संविधान निर्मितीसाठी लागले. संविधान निर्मिति साठी अनेक समित्या होत्या. त्यात मसुदा समिती सर्वात महत्वाची समिती होती.. याच समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.. त्यांना अनेक विद्वान जसे बी एन राव इ.सारख्याचे सहाय लाभले . बाबासाहेबांनी जगातील ५० हून अधिक संविधानाचा अभ्यास केला.. आणि आपल्या प्रज्ञेच्या,जोरावर जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान निर्मीत केले.

संविधान निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे . म्हणुनच त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हटले जाते .





संविधानातील तरतुदी 

मूलभूत अधिकार (न्याय प्रविष्ट ) , कायद्यामुळे समानता, विचार व अभिव्यकी स्वातंत्र्य, कल्याणकारी राज्य साठी मार्ग दर्शक तत्व , स्वतंत्र कायदेमंडळ, न्याय मंडळ. निर्माण करण्यात आले आहेत .

      कायदेमंडळ,न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ,आणि मीडिया ही लोकशाहीची आधार स्तम्भ आहेत.. लोकशाही च्या संवर्धनासाठी ही स्वतंत्र पणे काम करतील या साठी तरतूद केली आहे.

      लोकशाही म्हणजे फक्त बहुसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करत असून अल्पसंख्याकाना ही हक्काची ग्वाही ,आणि सुरक्षेची हमी देते.. अनेक धर्म,जात,पंथ,भाषा असलेल्या आपल्या देशात हे फक्त लोकशाही च्य तत्वाने च शक्य होऊ शकते . चेक अँड balance हा लोकशाही व्यवस्थेचा आकर्षक सिद्धांत आहे.. न्याय्य व्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा यांच्यामधे सुयोग्य सांगड घालण्यात आली आहे.


   लोकशाही मधील विरोधी पक्षाचे स्थान:

सरकार वर लोकप्रतिनिधी द्वारे नियत्रंण हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट आहे..विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारत असतो . एक प्रकारे संसदे तर्फे विरोधी पक्ष सरकार वर नियंत्रण ठेवत असते ..

लोकशाही मध्ये विरोधी मताच महत्व 

 "तुमचं विरोध मी माझ्या बुद्धीच्या जोरावर खोडून काढीन पण तुम्हाला तुमचा विरोध मांडता यावा यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन.." 

   व्हाल्टेअर फ्रेंच राजकीय तत्वंज्ञ (१६९४-१७९८)

   या वाक्याचा आधार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता . या वरून आपल्या लक्षात येईल की विरोधाला ही मान्य करण्याचं धाडस बाबासाहेबांनी, घटनाकारांनी दाखवले होते...मात्र आज आपण पाहतो की सत्ता मिळाली की विरोधाची गळचेपी करण्यासाठी यंत्रनेचा वापर केला जातो.. लोकशाही व्यवस्था प्रत्येकाला आपली जागा दाखवण्यास समर्थ आहे.. सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी, सर्वसमावेशक धोरण अमलात आण्यासाठी करावा. सत्ता मिळाल्यावर व्यक्तीचं खर रूप उघडकीस येत असते.. अमेरिकेच्या महान माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचं सुप्रसिद्ध वाक्य या प्रसंगी लागू पडते.

"Nearly all men can withstand adversity, but if you want to test a man’s character, give him power.” - 

व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासायचे असेल तर त्या व्यक्तीला सत्ता, अधिकार द्या. प्रत्येक गोष्टीची नागरिक नोंद ठेवत असतात.. मग सत्तांतर करणे हे पण आपल्या हातातच असते ..

   आज आपण संविधान दिनानिमित्त आपल्या संविधानाच रक्षण करणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे असं मानून तिच्या संरक्षणासाठी कटिबध्द राहण्याची प्रतिज्ञा करूयात... कारण आपण भारताचे लोक भारताचे भाग्यविधाते आहोत...

प्रलय भारत सावंत

२६ नोव्हेंबर २०२२


महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...